माझ्या विषयी

आपल्या आजुबाजुला अनेक गोष्टी घडत असतात, त्या बघतांना अनुभवतांना अनेकदा आपण त्यावर व्यक्त होत असतो. आजच्या काळात मोकळे आणि लांबलचक वाचणे तसेच लिहणे दुर्मिळ होत चालले आहे. अर्थात त्याला काळाचा वाढलेला वेग किंवा आपल्याला झटपट मनोरंजनाची लागलेली सवय कारणीभूत असू शकतात. आता हे वाईट की चांगले यात न जाता, मी हा प्रपंच का करतोय हे सांगणे क्रमप्राप्त आहे.

तर झाले असे की अभियांत्रिकी शिक्षण घेत असतांना लिखाण हा काही माझा प्रांत नव्हता. वाचन देखील अगदीच किरकोळ स्वरूपाचे होते. पण नंतर जशी माझ्या करियरची गाडी स्पर्धा परीक्षांच्या मार्गावर लागली, तशी ही परिस्थिती बदलली. परीक्षेसाठी वाचन वाढले, तसेच लिखाण ही ओघाने सुरू झाले, अर्थात ते युपीएससीच्या चौकटीतच होते. पुढे वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या संपादकांना पत्र लिहण्याचा छंद जडला आणि त्यातून मग अभिव्यक्तीचा एक नवा मार्ग मला दिसला.

या लिखाणातून आपल्या आनंद येतोय हे समजल्या नंतर दीर्घ लिखाण करण्याचा विचार मनात येऊ लागला. त्याच सोबत अनेकांनी लिखाण वाढवण्यासाठी प्रोत्साहन देखील दिल्याने ब्लॉग लिखाण सुरू केले. त्या ब्लॉगवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत, त्यातून अनेक नव्या गोष्टी देखील मला उलगडू लागल्या. त्यामुळे एकाच वेळी आनंद देणारी आणि वैचारिक दृष्ट्या समृध्द करणारी गोष्ट म्हणुन हे लिखाण सुरू राहिले. मध्ये अनेकदा यात उतार चढाव येत राहिला, ट्विटर सारख्या समाज माध्यमात लिखाण वाढले आणि ब्लॉग थोडासा मागे राहू लागला.

माझ्या विषयी

ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव

या सर्व परिस्थितीत स्पर्धा परीक्षा आणि समांतर शिक्षणाचे काही टप्पे पूर्ण करत होतो, तर काहीवेळा अडकून पडत होतो. पण लिखाण सुरू राहिले, कारण लिखाण हा नेहमी आनंद अनुभवाचा मार्ग राहिला आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा आणि राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांच्या अभ्यास कक्षेच्या बाहेर जाऊन मुक्तछंद लिखाण करणे नेहमीच आनंददायी राहिले आहे. आता शैक्षणिक दृष्ट्या पीएचडी सुरू असतांना, आपण आपल्या ब्लॉगला वेबसाईटचे स्वरुप द्यावे हा विचार मनात आला. याला आणखी एक कारण ठरली मी सुरु केलेली, www.upscinmarathi.com ही वेबसाईट.

UPSCinMarathi च्या माध्यमातून UPSC आणि MPSC साठी आम्ही मराठी भाषेत अभ्यास साहित्य बनवत आहोत. पण तिथे परत अभ्यासक्रम आणि परीक्षेची गरज याची एक मर्यादा आहे. त्यामुळे मुक्तछंद लिखाणासाठी दुसरा मार्ग निवडणे आवश्यक होते. त्यातूनच निर्माण झाली आपली ही www.mauliwrites.com वेबसाईट.

आता आपले लिखाण खरंच वेबसाईट स्वरुपात प्रस्तुत करावे, अगदी या गुणवत्तेचे आहे का? असा प्रश्न होताच. अर्थात आपण खूप काही अनोखे लिहीत आहोत आणि वाचणार्‍यांना त्याचा खूप काही फायदा होणार आहे, असा वेबसाईट बनवण्याच्या मागचा अविर्भाव अजिबात नाहिये. मला लिखाणाने आनंद मिळतो आणि त्या लिखाणाचे साधन म्हणून ही वेबसाईट आहे, एवढाच उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून ही वेबसाईट बनवली आहे. त्यामुळे अर्थातच ही वेबसाईट काही साध्य नाहिये, ती केवळ एक साधनच आहे…

आपलाच
ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव