रिजिम विरुद्ध सरकार!

regime vs government

अगोदर नीट पेपरफुटीच्या संदर्भातील आंदोलन, त्यानंतर निवडणूक आयोगातील अनियमितता आणि SIR प्रक्रियेवरील आक्षेप, या अनुषंगाने आंदोलन देशभरात होतांना दिसत आहेत. त्याच निमित्ताने मागील 1-2 आठवड्यात अनेकदा ‘रिजिम चेंज’च्या संदर्भातील चर्चा सरकार आणि आंदोलकांच्या बाजूने होतांना दिसत आहेत.

आपण नेहमी ‘सरकार बदलणे’ हा शब्द वापरातांना बघितला आहे. त्यासाठी एक संविधानिक प्रक्रिया देखील आहे. पण ‘रिजिम बदलाच्या’ संदर्भात आपण भारतीय परिप्रेक्ष्यात क्वचितच ऐकतो. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर जेव्हा इराण वर अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला केला, तेव्हा देखील रिजिम बदलाचा मुद्दा चर्चेत आला. त्यामुळे आपल्याला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की सरकार आणि रिजिम यात नेमका काय फरक आहे, की दोन्ही सामनाच आहेत.

आपण ही तुलना दोन अंगाने करणार आहोत. त्यातील पहिले अंग अर्थातच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे असून दुसरे अंग हे भाषा शास्त्रीय स्वरूपाचे आहे.

राज्यशास्त्रात रिजिम हा शब्द फक्त सरकार किंवा शासन यापेक्षा खूप विस्तृत आहे. ज्यात कायदेशीर प्रक्रिया, राज्य पद्धती, शासन संरचना आणि संस्थात्मक ढाचा यांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे जेव्हा एखादी रिजिम बदलायची चर्चा होते, तेव्हा ही पूर्ण संरचना बदलण्याच्या आयामातून चर्चा होतांना दिसते.

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगाने आपण जेव्हा यागोष्टीकडे बघतो, तर तेथे देखील राज्यशास्त्राच्या अनुषंगाने अर्थ अभिप्रेत आहे. परंतु जेव्हा रिजिम हा शब्द एखादे आक्रमणकारी राष्ट्र-राज्य वापरते, तेव्हा त्याला समोरच्या देशातील संरचनेला अन्यायकारक ठरवायचे असते. जसे अमेरिकेने इराण वर हल्ला करतांना वापरलेला रिजिम हा शब्द.

आंतरराष्ट्रीय राजकारणातील हा नकारात्मक अर्थ भाषा शास्त्रीय स्वरूपाचा आहे. इंग्रजीत भाषिक अंगाने जेव्हा रिजिम शब्द वापरला जातो, तेव्हा सबंधित सत्तातंत्राला अधिमान्यतेचा (लिजिटिमसी) अभाव असल्याचे अधोरेखित केले जाते. विशेषतः पत्रकार किंवा लेखक जेव्हा रिजिम शब्द वापरतात तेव्हा ते संबंधित शासन यंत्रणेला जनतेची मान्यता नाही, असे अधोरेखित करत असतात. आपण जेव्हा ‘तालिबान रिजिम’, ‘सोव्हिएत रिजिम’ शब्द वाचतो, तेव्हा त्यात पाश्चात्त्य तसेच भाषिक अंगाने संबंधित शासन यंत्रणेला नकारात्मक अंगाने बघण्याचा आयाम दिसून येतो.

त्यामुळे जेव्हा आपण रिजिम किंवा सरकार हे शब्द वाचतो, तेव्हा ते कोणी आणि कोणत्या अंगाने वापरले आहेत, याचा नक्की विचार केला पाहिजे. अन्यथा आपल्याला समोरच्याचा गर्भित अर्थ समजणार नाही. तसेच जेव्हा पाश्चात्त्य राजसत्ता, पत्रकार किंवा लेखक हा शब्द वापरत असतील तर त्या मागचा सुप्त उद्देश देखील लक्षात घेतला पाहिजे.

Share this content:

Avatar photo

विविध बाबींवर व्यक्त होण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा एक आयाम असतो, अशा अनेक आयामांच्या अभिव्यक्तीतून सामाजिक चर्चा विश्व फुलत जाते. यातूनच एकंदरीत मानवी विचार विश्व बहरत जाते. पूर्वापार चालत आलेल्या अभिव्यक्तीच्या माध्यमांना, आता आधुनिकतेची किनार लाभली आहे. या आधुनिक साधनांचाच एक भाग असलेल्या, ब्लॉगच्या माध्यमातून मी दृष्टिकोन येथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तो वाचून अभिप्राय द्यायला एवढीच अपेक्षा...

Post Comment

You May Have Missed