स्थलांतरितांची दिवाळी…
आमचे गाव तसे MIDC भागात येते, त्यामुळे लहानपणी दिवाळीच्या पुढे मागे कामगार वर्ग त्यांच्या गावी जायचा, तेव्हा बर्यापैकी वर्दळ कमी असायची. त्यात आमचे मित्र-मैत्रिणी देखील त्यांच्या मूळ गावी जायचे, तेव्हा गाव रिकामे-रिकामे वाटायचे. मार्केट मध्ये बर्यापैकी व्यवहार देखील कमी असायचे. तेव्हा कधी एकदा हे चार दिवस संपतात आणि गावी गेलेले लोक परत येतात याची आम्हाला चाहूल लागायची.
कालांतराने गावचा आणखी विस्तार झाला, बहुतांश कामगारांनी स्वतःचे घरी बांधली. त्यामुळे आता बरेच लोक दिवाळी इकडेच करतात, त्यामुळे आता दिवाळीत देखील वर्दळ तशीच असते. स्थलांतर झाल्या नंतर जे प्रश्न असतात, ते आमच्याकडे देखील तसेच आहेत. तरी देखील स्थलांतरित आणि मूळ गावकरी यांच्यात तसे काही वितुष्ट नाहिये. हे सर्व आठवण्याचे कारण अर्थातच पुण्यातील तथाकथित मूळ पुणेकर लोकांचे बडबड गीते!
आमच्या गावातील लोकांना याची जाणीव आहे की, आपल्याला आलेली ही भरभराटी MIDC आणि त्यामुळे आलेल्या स्थलांतरितामुळे आहे. आता ही जाणीव असणे आणि त्यातून तिरस्काराची भावना निर्माण न होणे, याला अर्थातच अनेक गोष्टी कारणीभूत आहे. मग ही भावना पुण्यातील लोकांत नाहिये का? तर ती भावना नक्कीच बहुतांश लोकांत आहे. पण काही रिकामटेकडे आणि स्थलांतरितामुळे वाढलेल्या किमतीचे उपभोगता असलेल्या लोकांना त्याची जाणीव दिसत नाही. त्यातून दरवर्षी या बाबींवर सवंग चर्च होतांना दिसते.
अर्थात कोणत्याही भागात इतर भागातून लोक का येतात? त्याचे सरळ आणि सोपे कारण आहे, औद्योगिकीकरण आणि रोजगार संधीतील व्यस्त प्रमाण. हे व्यस्त प्रमाण का असते, त्याचे अनेक भौतिक, भौगोलिक आणि राजकीय कारणे आहेत. त्यावर नंतर कधीतरी चर्चा करता येईल. पण जेव्हा एखाद्या राज्यातील ठराविक शहरे पुढे जात असतील आणि इतर शहरे मागे राहत असतील, तर त्यामागे धोरणात्मक निर्णय घेतांना एका विशेष भागाला देण्यात आलेले अति महत्त्व कारणीभूत असते.
महाराष्ट्रातील औद्योगिकीकरणात मुंबई नंतर सर्वात जास्त महत्त्व दिले गेले ते पुण्याला, कारण त्याचे भौगोलिक स्थान आहे. तसेच राज्यातील संसाधनांचे अव्यस्त प्रमाणात झालेले केंद्रीकरण देखील त्याला कारणीभूत आहे. अर्थात त्यामुळे झालेल्या रोजगार निर्मितीचे प्रमाण देखील तत्कालीन पुण्याच्या श्रम शक्ति पेक्षा जास्त होते. त्यातून रोजगारासाठी संबंध महाराष्ट्रातून पुण्याच्या दिशेने स्थलांतर झाले. आता जर तथाकथित मूळ पुण्यातील लोकांना हे स्थलांतर नको होते, तर त्यांनी तेव्हाच औद्योगिकीकरणाला विरोध केला पाहिजे होता. त्यामुळे पुढच्या गोष्टी उद्भवल्याच नसत्या.
पुण्याच्या विकासात अनेक गोष्टींचा वाटा आहे, त्यातील एक वाटा हा महाराष्ट्रातील इतर भागात न झालेल्या विकासाचा देखील आहे. अर्थात त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. आता हा स्थलांतरिताचा मुद्दा काय फक्त राज्यांतर्गत राहिला नाहिये, इतर राज्यांतून येणार्या स्थलांतरिताच्या बाबतीत देखील आपण हीच फुटपट्टी लावत असतो. तसेच आपल्या देशातून विदेशात गेलेल्या लोकांना देखील तेथील लोक पाण्यात पाहातच असतात.
त्यामुळे काहीच न करणारे आळशी आणि गर्भश्रीमंत लोक सोडले, तर इतर सर्वांना हा स्थलांतरितांसाठी असलेल्या आकस जीवनातील एका टप्प्यावर अनुभवायला मिळतोच. आता समजा पुण्यात हे स्थलांतर झालेच नसते, तर इथल्या जमिनीला खरंच इतका भाव आला असता का? फक्त घरभाड्यावर जगणे पुण्यातील काही मंडळींना शक्य झाले असते का? त्यामुळे काही निवडक लोक आणि त्यांच्या बालिश बडबड गीतांना इग्नोर करून, सर्वांना आपण आहात त्या ठिकाणी आनंदाने दिवाळी साजरी करा आणि हवे त्या ठिकाणी स्थलांतर करा!
दिवाळीच्या खूप सदिच्छा 🪔❤️
Share this content:



Post Comment